मन वढाय वढाय
फोनची रिंग वाजली. तिने फाईल वरून नजर हटवित," यावेळेस कुणाचा फोन?" म्हणत फोनच्या स्क्रीन कडे एक नजर टाकली.
"अहो" calling...." यावेळेस मनीष चा फोन!" तिला आश्चर्य वाटले.
"आज तर याची मिटींग होती ना! वेळ झाला, उशिर होईल म्हणून टिफिन देखील नेला नव्हता. सकाळी लवकर ची ट्रेन पकडायची होती म्हणून लवकरच घराबाहेर पडला.
आज बोलणेही झाले नाही आमचे!
म्हणून तर नसेल ना केला फोन??"
मृणालच्या मनाच्या कॅनव्हासवर सेकंदात, झरझर विचार उमटले.
गाडीला ट्रॅक बदलायला जेवढ्या सेकंदाचा अवधी लागतो, तेवढ्या सेकंदभर क्षणात विचारांचे तरंग मनात उठतात. विचारांना काही थांगपत्ताच नसतो. एका मागोमाग एक विचार पिच्छा पुरवतात आणि मग पुरती दमछाक होते.
या विचारांना थोपवून परत पूर्व मनस्थितीत येईपर्यंत विचारांनी घोळ केलेला असतो आणि पहिल्या विचाराशी शेवटच्या विचाराशी काही मेळ लागत नाही. शेवटी शून्य अवस्थेत ती शेवटच्या विचाराला थोपवते.
हे मृणालचे अतिविचारी आणि भावनाशील मन तिलाच मानसिकरित्या थकवते.
तिने विचारांची शृंखला थांबवित फोन रिसीव्ह केला.
" हॅलो मृणाल, लंच झाला का तुझा?" इति मनिष.
"नाही रे, अजून आहे अर्धापाऊण तास"
"मग एक काम कर ना, आज हाफ डे टाकून घरी ये"
"का रे, काय झालं?.. आणि काय झालं मीटिंगचं?....तुझी मिटिंग आटोपली का?....तू घरी आलास का?... तब्येत बरी वाटत नाही का?.... काय झालं बोलत का नाहीस?.....
मृणालच्या विचारांच्या वारुने, दौडात प्रश्नांच्या फैरी झाडल्या.
" रिलॅक्स, अगं किती प्रश्न विचारतेस? ऐक, काहीही झालेलं नाही. मिटिंग लवकर आटपली आणि मी हाफ डे घेऊन घरी आलो. म्हटलं तुला पण म्हणावं, घे हाफ डे! म्हणून. फोन केला तर तुझ्या विचारांचे इतक्या साऱ्या प्रश्नात रूपांतर!
धन्य आहे तुझी. मग म्हणतेस की मला फोन करून सांगितले देखील नाही."
"बरं बरं, मी कळवते तुला. पण काम भरपूर आहे. मला नाही वाटत, आज हाफ डे घेऊ शकेल मी..."
" काय हे मृणाल, नेहमी म्हणतेस की वेळ काढत नाहीस आणि आज वेळ काढला तर तुझी नसती कारणं!..."
"अरे, पण मला आधी सांगायचंस ना, मी हाफ डे काय फूल डे रजा घेतली असती."
"अगं काही काय बोलतेस! 'माझं आधीच ठरलं होतं', असं तुला वाटतं का?... मिटींग अपेक्षेपेक्षा लवकर आटपली आणि व्यवस्थित पार पडली....म्हटलं आज बाकी काम नको.
मृणाल ला सरप्राईज देऊ या... इथे सरप्राईज तर सोडाच पण तू तर लवकर यायलाही तयार नाहीस. सगळा मूडच घालवतेस तू!.."
"अरे, मूड मी घालवते!...काय बोलतोस तू? ऑफिस मधून बोलते आहे मी... काय बोलू?... तू सरळ सरळ ब्लेम करतोस माझ्यावर. तू ठेव फोन. मला काहीही स्पष्टीकरण नको आहे."
आणि मृणाल ने फोन ठेवला.
झालं! चांगल्या संभाषणाचा शेवट हा असा झाला. मृणाल ने फोन तर कट केला पण मनातून तिला वाईट वाटलं... "काय हे, एवढ्या रोमँटिक मूडमध्ये होता तो आणि आपण त्याचा फोन कट केला आणि वर येणार नाही म्हणून सरळ सरळ तोंडावरच सांगितले. हे योग्य नाही.
"तो बिचारा जेवलेलाही नाही. एकत्र जेवूया म्हणून लंच पूर्वीच फोन केला त्याने. आणि आपण काय केलं?...त्याच्या भावनांचा पूर्ण विचका केला."
तिने ठरवले त्याला सरप्राईज द्यायचं!
फायलींचा(दस्त) ढीग तिने टेबल वरून उचलून, बांधून जागेवर ठेवला. टिफिनही न खाता हाफ डे चा अर्ज टाकला आणि तडक घराकडे जाण्यासाठी, टॅक्सी पकडली.
सोसायटी जवळ आल्यावर तिने टॅक्सी थांबवली. टॅक्सीचे भाडे दिले. दुपारची वेळ होती. सगळीकडे नि:शब्द शांतता! मनीषला सुखद आश्चर्याचा धक्का द्यायला अन त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायला मृणाल आतुर झाली होती. जिन्याच्या पायऱ्या चढताना तिच्या छातीची धडधड वाढत होती. दार उघडल्याबरोबर तिला पाहताच तो उतावीळ प्रियकरासारखा तिला आपल्या जवळ ओढणार... या विचाराच्या तंद्रीत ती कितीतरी वेळ बेल वाजवित होती.
मात्र दार कोणी उघडेना. "झोपला की काय हा?" एक शंका मनात उद्भवली आणि तिला चीड आली.
"काय हे, मी एवढ्या धडपडत येते आहे आणि याला काहीच पडली नाही. डाराडूर झोपला आहे... अरे! पण त्याला कुठे माहित? की आपण येणार आहोत ते... एकटाच जेवून, झोपला असेल..." तिने तिलाच समजावले आणि विचारांना ब्रेक दिला.
"काय करावे? फोन लावून बघते. फोन तरी जवळ असेल का? नको नको... अरे काय वेडे आपण! दुसरी लॅचकी आहे की!" तिने कपाळावर हात ठेवला.
" काय वेडेपणा हा...नको नको ते विचार डोक्यात येतात पण हा साधा सरळ विचार, बरा आपल्या डोक्यात नाही आला."
तिने चाव्यांचा जुडगा पर्समधून बाहेर काढला. त्यातील लॅचची चावी लावून दरवाजा उघडला. हळूच दरवाजा बंद करून, आवाज न करता, तिने पर्स सोफ्यावर ठेवली. चाव्यांचा जुडगा जागेवर ठेवला आणि आश्चर्याचा सुखद धक्का द्यायला, ती बेडरूम कडे वळली.
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला ती आतुर होती. ते क्षण तिला छळत होते. ती बेडरूम मध्ये आली आणि आश्चर्याचा धक्का मात्र तिलाच बसला!....मनीष बेडरूम मध्ये नव्हता.
" बापरे! काय हे वेड्यासारखे आपण इकडे तिकडे करतो आहे आणि हे महाशय कुठे आहे???" तिची चीडचीड सुरू झाली.
पोटातल्या भुकेची तिला आता जाणीव झाली.
"तहानभूक विसरून ज्याच्याकरिता धावतपळत समजवायला आली, तो कुठे आहे??"
स्वयंपाक घराच्या ओट्यावर, भांड्यांची चरत पडलेली दिसत होती....म्हणजे मनीष चे जेवण आटोपले होते.
खिडकीतून तिने बाहेर बघितले. शिस्तीत गेट बाहेर पडत असलेली, सकाळच्या शाळेच्या मुलांची रांग दिसत होती. बापरे! म्हणजे दोन वाजायला आले. तिचे डोके ठणकायला लागले.
ऑफिसच्या कामाचा डोंगर तिला दिसायला लागला. सारी कामे बाजूला ठेवून ती मनीषला समजवायला आली, तर इथे मनीष गायब!
तिची विचारांची शृंखला तिला स्वस्थ बसू देईना. पर्समधून फोन काढून तिने फोन लावला...
"हॅलो, अरे कुठे आहेस तू?"
"आता काय झालं? परत तोच प्रश्न!"
"अरे, पण तू कुठे आहेस... ते सांग मला."
"अगं, मी ऑफिसला आलोय आत्ताच. तू येणार नाही, म्हटल्यावर जेवलो. तेवढ्यात ऑफिसच्या सहकाऱ्याचा फोन आला. त्याला एका प्रोजेक्ट इश्यूवर डिस्कस करायचं होतं. मी विचार केला...घरी बसून तसाही एकट्याला कंटाळा येणार. म्हणून त्याला कळवलं...ऑफिसमध्ये आल्यावर बोलतो आणि लगेच ऑफिस गाठलं. कामात व्यस्त आहे आता. चल भेटूया, मग संध्याकाळी...."
असे म्हणून मनीषने फोन ठेवला देखील.
मृणालच्या डोळ्यांसमोर घटनांचा कॅलिडोस्कोप तरळला आणि मृणालने कपाळावर हात मारून घेतला.
आता मात्र डोक्यातील साऱ्या साऱ्या विचारांचा चुरा झाला होता. हसावं की रडावं तिचं तिलाच कळत नव्हतं....
_*वीणा विजय रणदिवे* ✍️
Comments
Post a Comment