जोडूया धागा पर्यावरणाशी
वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा अशी अनेक उपयुक्त झाडे पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवतात. कडुनिंबाच्या झाडाखाली थंडावा मिळतो. वडाच्या झाडाचे तर अगणित फायदे आहेत. वड अक्षय्य आहे. एका छोट्या बीजापासून निर्माण होणारे हे झाड अतोनात वाढतं. समाधिस्थ साधूच्या आश्रयाखाली प्राप्त होणारी शांतता, या झाडाच्या छायेखाली जाणवते. वडाच्या पारंब्या जमिनीला टेकून, जमिनीत स्वतःला रुजवून घेत, नवीन झाड तयार होतं. सृजनाचं हे अचंबित करणारं रूप म्हणजे हा #वटवृक्ष! या झाडाच्या पानांनी आद्रता शोषून घेऊन ओलावा टिकून राहतो. कित्येक हजार पटीने हवेतील धूळ-धूर शोषून घेऊन प्राणवायू निर्माण करण्याची प्रक्रिया हा वृक्ष करतो. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन हवेत प्राणवायू सोडण्याची त्याची क्षमता कैक पटीने जास्त आहे. आजूबाजूचा कित्येक मैल परिसर एका वडाच्या झाडामुळे प्रदूषणमुक्त राहू शकतो. त्याचे गुण अगणित आहेत. तो औषधीयुक्त आहे. कित्येक आजारांवर तो गुणकारी आहे. ...